अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री रॅकेटवर छापा टाकून चार जणांस अटक केली.
दरम्यान पोलिसांनी हि कारवाई नगर- औरंगाबाद राज्य महामार्गावरील वडाळाबहिरोबा येथे केली आहे. पोलिसांनी या छाप्यात तब्बल 11 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रेमडेसिवीर इंजेक्शन वडाळाबहिरोबा येथे विकले जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकून चार जणांस अटक केली आहे.
अन्न व औषध प्रशासनचे निरीक्षक अशोक तुकाराम राठोड यांच्या फिर्यादीवरुन रामहरी बाळासाहेब घोडेचोर, (वय 22) रा.देवसडे ता.नेवासा, आनंद पुंजाराम थोटे (वय28) (रा.भातकुडगाव ता.शेवगाव),
पंकज गोरक्षनाथ खरड (वय 29) (रा.देवटाकळी ता.शेवगाव) व सागर तुकाराम हंडे (वय 30)(रा.खरवंडी ता.नेवासा) या चौघास अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आहे.
कारवाईत एक कार, एक मोटारसायकल, मोबाईल, रेमडेसिवीर इंजेक्शन असा 11 लाख 70 हजाराचा ऐवज जप्त केला आहे.