राज्यात ११०० ते १४०० रुपयांना रेमडेसिविर मिळावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :-खासगी रुग्णालयांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांना रेमडेसिविरचा हे इंजेक्शन दिले जाऊ नये त्याचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पथक खासगी रुग्णालयांना अचानक भेटी देऊन रेमडेसिविर वापराबाबत माहिती घेतील, राज्यात कुठेही ११०० ते १४०० रुपये या किमतीत रेमडेसिविर मिळाले पाहिजे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात जाणवणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

महाराष्ट्राला रेमडेसिविरची कमतरता भासू नये यासाठी उत्पादन दुप्पट करावे, अशा सूचना दिल्या. रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमतानाच उत्पादक कंपन्यांनी शासकीय रुग्णालये आणि जिल्हाधिकाऱ्यांना इंजेक्शनचा पुरवठा करावा.

काळा बाजार होऊ नये म्हणून त्याची एमआरपी कमी करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी केल्या. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्याला सध्या दररोज ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे.

सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिल अखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करावे. कंपन्यांनी वाढीव उत्पादनाला सुरूवात केली असून

त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन उत्पादन यायला किमान २० दिवस लागतील. त्यानंतर राज्यात त्याचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातील तुटवड्याची स्थिती लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आयात करण्यासाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राला देण्याचे मान्य केले आहे.

मात्र पुढील काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कंपन्यांच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ७० टक्के पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे.

सध्याच्या तुटवड्याच्या काळात या प्रमुख उत्पादक कंपन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा थेट शासकीय रुग्णालयांना करावा.

जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचा पुरवठा केल्यास त्यांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात येईल, अशी यंत्रणा करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. यामुळे काळाबाजार रोखण्यास मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24