अवैध सावकारकी केली तर याद राखा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- दिवसाला हजार रुपये व्याज घेणाऱ्या खासगी सावकाराविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज उर्फ भोप्या सय्यद (रा.कर्जत) असे अाराेपीचे नाव आहे.

याप्रकरणी संदीप ईश्वर कळसकर(बदललेले नाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने कळसकर यांनी गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडून ऑक्टोबर २०२० रोजी व्याजाने २ लाख रुपये घेतले होते.

मात्र त्या व्याजाचा दर हा एक लाखाला प्रतिदिन १ हजार रुपये असा होता.त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी कळसकर यांनी सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दीड लाख रुपये घेतले.

या सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते.त्यानंतर आरोपीने व्याजाला चक्रवाढ रक्कम लावल्याने मुद्दलची रक्कम ही ६ लाख रुपयांवर गेली. फिर्यादीने व्याजापोटी ३ लाख रुपये दिले.

३ लाखांची रक्कम देऊनही ९ लाख रुपये आणखी द्यावे लागतील असे आरोपीने सांगितले.आरोपी हा पैसे वसूल करण्यासाठी गाडी अडवून दमदाटी व शिवीगाळ करत होता. त्याने फिर्यादीच्या स्विफ्ट कारची नोटरी करून त्याच्याकडून २ कोरे धनादेशही घेतले.

माझी सध्या पैसे देण्याची परिस्थिती नाही माझे व्याज माफ करा, मी तुम्हाला मुद्दल टप्प्याटप्प्याने देतो, अशी विनंती केली मात्र आरोपीने ऐकले नाही. आरोपीच्या त्रासामुळे फिर्यादीची मानसिक स्थिती खराब झाली होती.

कळसकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे सय्यदविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणीही अवैध सावकारकी करुन कोणत्याही नागरिकाला वसुलीसाठी वारंवार फोन करणे,घरी येणे,शिवीगाळ करणे,वस्तु उचलून

नेणे अगर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल तर याद राखा. सावकाराकडून असा कोणताही प्रकार होत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करा.

कोणत्याही तक्रारदारास सावकाराकडून त्रास होणार नाही याची पोलिस काळजी घेतील असे चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक, कर्जत यांनी सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24