अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अकोले व संगमनेरसाठी प्रांताधिकारी एक असताना अकोले तालुक्याला रेमडोसिवीर इंजेक्शनचा पुरवठा अतिशय कमी व संगमनेरसाठी जास्त, असे का? संगमनेरला मंत्री म्हणून झुकते माप का? दुजाभाव करणाऱ्या त्या प्रांताधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे, ऑक्सिजन गॅस चढ्याभावाने विक्री करून पुरवठा वेळेत न करणाऱ्या संगमनेरच्या जाजूवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
दोन दिवसांत यामध्ये सुधारणा न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल, असा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी प्रशासनाला दिला. अकोले तालुका डॉक्टर व मेडिकल असोशीएशन, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते, सर्व सामाजिक संघटना,
अकोले तालुका लॅब असोसिएशनच्यावतीने अचानक तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, की अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.
मात्र त्या तुलनेत अपुऱ्या सोयी- सुविधा मिळत आहेत. त्यामुळे औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत. दि. १५ एप्रिल रोजी संगमनेर प्रांत कार्यालयात ४८२ रेमडेसिवीर इंजेक्शनपैकी संगमनेरला ४७२ व अकोलेला केवळ १० रेमडेसिवीर देण्यात आले.
ही बाब अकोले तालुक्यावर अन्याय करणारी आहे. यात सुधारणा होऊन मागील अनुशेष भरून काढावा. तालुक्यात पूर्ण क्षमतेने लसीकरनाची मोहिम राबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
आमदार डॉ. लहामटे यांनी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना फोन लावला असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. यानंतर आ. लहामटे यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे मंगरुळे यांच्या बदलीची मागणी केली.