अहिल्यानगर- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बँकेच्या ठेवीदारांची प्रतीक्षा अखेर संपली असून प्रशासक गणेश गायकवड यांनी यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या ५० टक्के रक्कम थेट ठेवीदारांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.
बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी डीआयसीजीसी व रिझर्व्ह बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळताच ठेवी परत देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आता बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवरही तपास करून कायदेशीर कारवाई पोलिसांनी गतिमान करावी, अशी मागणी बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा व बँक बचाव समितीने केली आहे.

राजेंद्र चोपडा यांनी म्हटले आहे की, नगर अर्बन बँकेच्या १९४० ठेवीदार व खातेदारांना पाच लाखांपुढील ठेवींपैकी निम्मी रक्कम मिळण्यास सुरुवात झाली ही आनंदाची बाब आहे. आता बँकेतील आर्थिक घोटाळ्याचा तपासही वेगाने होणे अपेक्षित आहे. पोलिसांनीच केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटनुसार १०५ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यात तत्कालीन काही संचालक, काही वरिष्ठ अधिकारी तसेच कर्जदारांचा समावेश आहे.
बड्या थकबाकीदारांकडील थकबाकी वसुलीसाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच सखोल तपास करून दोषींवरही कायदेशीर कारवाई झाल्यास बँकेच्या हितचिंतकांमध्ये चांगला संदेश जाण्यास मदत होणार आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रश्रांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस उपअधीक्षक उगले व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी वेगाने तपास केला पाहिजे.
आजही अनेक आरोपी मोकाट समाजात वावरत आहेत. आपल्याला धक्का लागू शकत नाही असा त्यांचा अविर्भाव असतो, अशा लोकांना कायदा काय असतो हे पोलिसांनी दाखवून द्यावे.
बँकेत कृष्णकृत्य करणारांविरोधात वेळोवेळी आवाज उठविण्याचे व सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत.
मात्र आमच्यावरही खोटे आरोप करण्यात आले. मात्र, आम्ही या आरोपांना भीक न घालता व्यापक जनहिताचे काम चालूच ठेवणार आहोत. आर्थिक घोटाळ्याच्या या गंभीर विषयात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही लक्ष घालून सहकार्य करावे, ही आग्रहाची विनंती राजेंद्र चोपडा यांनी केली आहे.
अवसायकांचे अभिनंदन
कर्ज वितरण करताना केलेल्या फसवणुकीमुळे या चुका झालेल्या आहेत. हा फार मोठा आर्थिक गुन्हा आहे. बँकेचे अवसायक गणेश गायकवाड व त्यांचे आज बँकेत असलेले काही अधिकारी, कर्मचारी हे सुध्दा थकबाकी वसुलीसाठी जोमाने प्रयत्न करीत आहेत. त्यांचेही बँक बचाव समिती अभिनंदन करीत असल्याचे चोपडा यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे
बँकेने कर्जदारांच्या ज्या काही तारण दिलेल्या मालमत्ता आहेत, त्या जप्ती करण्यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय ऑर्डर देण्यासाठी खालील संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांना काही तलाठी, सर्कल या विषयात सहकार्य करीत नाहीत. महसूल खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात अशी आग्रही मागणी राजेंद्र चोपडा, बँक बचात कृती समितीने केली आहे.