अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कृषी कायदे, कामगार कायदे यासारख्या जाचक कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलने सुरूच आहे. आता याच मुद्यावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपोषण करणार आहे.
दरम्यान थोरात हे श्रीरामपुरात उपोषणाला बसणार आहे. सविस्तर वृत्त असे कि, केंद्र सरकारने विना चर्चेने पास केलेले तीन शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ आणि मागील शंभर दिवसांपासूनदिल्लीच्या सीमेवर असलेल्या
शेतकर्यांना पाठिंबा देत होणार्या भारत बंदला सक्रीय पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे आज शुक्रवार दि. 26 मार्च रोजी 11 वाजता श्रीरामपूर येथे उपोषणाला बसणार आहेत .
कृषी कायदा, कामगार कायद्याच्या शंभर दिवसांच्या आंदोलनानंतरही केंद्र सरकारने या शेतकर्यांकडे दुर्लक्ष केले आहे. यामध्ये सुमारे तीनशे शेतकरी शहीद झाले आहे.
या सर्व शेतकर्यांना पाठिंबा तसेच पेट्रोल-डिझेलची झालेली भरमसाठ भाववाढ या विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन होत आहे. शुक्रवारी 26 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता श्रीरामपूर येथे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात,
आ. लहू कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे यांसह विविध पदाधिकारी उपोषणात सहभागी होणार आहेत. तरी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.