‘त्या’ वाहनांच्या लिलावातून महसूलला मिळाले लाखो रुपये!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- नगर तहसीलच्या कार्यक्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यात ज्या वाहन मालकांनी दंडाची रक्कम भरली नाही, अशा २२ वाहनांचा बुधवारी नगर तहसील कार्यालयात लिलाव करण्यात आला.

या लिलाव प्रक्रियेतून महसूल विभागाला तब्बल २४लाख रुपयांचा महसूल जमा झाला. या लिलावासाठी एकूण २८ वाहनांबाबत यादी प्रसिद्ध करण्यात आली होती, तसेच याला व्यापक प्रसिद्धी सुद्धा देण्यात आली होती.

यामुळे सहा वाहन चालकांनी पंधरा लाख वीस हजार रुपये एका दिवसातच तहसील कार्यालयात जमा केले. उर्वरित २२ वाहनांचा लिलाव करण्यात आला ज्यातून एकूण २४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.

असा एकूण ४०.४७ लाख रुपयांचा महसूल लिलाव रूपाने जमा झाला. ही लिलाव प्रक्रिया प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाडला. यावर्षी कोव्हीड -19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महसूल विभागाचे वसुलीचे लक्ष सुमारे दीडपट वाढवले आहे.

त्यामुळे वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. अहमदनगर तहसील कार्यालयास एकूण ३३ कोटी सहा लाख रुपयाचे वसुलीचे उद्दिष्ट दिल्यामुळे या उद्दिष्टपूर्तीसाठी वाहनांचा लिलाव हा एक मुख्य मार्ग म्हणून पुढे येत आहे. यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांना सुद्धा चाप बसला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24