अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- सैनिक समाज पार्टी व अरुणोदय क्रांती सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने उठ नागरिक जागा हो, लोकशाही व्यवस्था परिवर्तनाचा धागा हो! ही घोषणा देण्यात आली असून, व्यवस्था परिवर्तन अभियानाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे व अरुणोदय क्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण खिची यांनी दिली.
तसेच सैनिक समाज पार्टीचे सक्रीय सदस्य होऊन राष्ट्र सेवा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये अनेक बदल घडवण्यात आले. यावरून आजमितीस वाढता भ्रष्टाचार, महागाई, लोकसंख्या तसेच गुन्हे व गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये होणारी वाढ यांच्यासारखे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत.
यावरून लोकशाहीतील घटनात्मक दृष्ट्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्या ऐवजी दिवसंदिवस खालविल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. राजकीय पक्षाकडून विकास व प्रगतीच्या नावाखाली देश व संस्कृतीतील लोकशाहीची प्रस्थापित ब्रीद वाक्ये ही फक्त आणि फक्त नाव रूपालाच राहिली आहे.
सद्यस्थितीत लोकशाहीचे नाव मोठे लक्षण मात्र खोटेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लोकशाहीतून राज्यघटनेने नागरिकांना मतदानाचा सर्वात मोठा हक्क व अधिकार दिलेला आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता व संरक्षणाचे हक्क घटनेतून मिळाले असूनही परिस्थिती नसल्यासारखी आहे.
लोकशाहीतील सध्याची न्याय व्यवस्था, गुन्हे व गुन्हेगारी प्रवृत्तीत होणारी वाढ व राजकीय बदलाचे समीकरण मारक ठरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयात दाखल होणार्या खटल्याची वाढ, तक्रार, फिर्याद व दावा दाखल केल्यानंतर ठराविक वेळेत न्याय मिळेल किंवा नाही याची खात्री नाही.
न्यायालयाची विश्वासार्हता वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे. वारंवार तारखा मिळत असल्याने न्यायासाठी नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. न्यायप्रक्रियेत बहुतांशी व्यक्तीकडून कायद्याच्या आर्थिक घोडेबाजार भरवले जातात. न्यायव्यवस्था ही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची बनली आहे.
प्रत्येक नागरिकाला योग्य वेळेत न्याय मिळावा, ही राज्यघटना सांगते. यासाठी न्याय पद्धतीत योग्य सुधारणा करणे ही काळाची गरज बनली आहे. गुन्हे व गुन्हेगारी प्रवृत्तीत होणारी वाढ आजमितीस राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात नाही, तर जनतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असणार्या पोलिस यंत्रणेत सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे.
अन्याय, अत्याचार, बलात्कार, चोरी, लुटमार याचे अनेक प्रकार दररोज घडत आहे. वास्तविक पाहता हे सगळे प्रकार कायद्याने निषिद्ध आहे. तरी असे प्रकार वाढत आहे. याला कारण मानसिक वैफल्यग्रस्त परिस्थितीच कारणीभूत आहेत.
तसेच वाढत्या गुन्ह्याला व गुन्हेगारी प्रवृत्तीला इंग्रजांचे कायदे व त्यामधील त्रुटी जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रसिध्दीपत्रकात सांगण्यात आले आहे. लोकशाही चालविण्यासाठी एक सत्ताधारी व दुसरा विरोधी या दोन पक्षाची गरज आहे.
परंतु मागील वीस वर्षाच्या कालावधीत अनेक पक्ष निर्माण झाले आहेत. एक ना धड भाराभर चिंध्या, अशी गत राजकीय पक्षांची झाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष असतो.
परंतु या परिस्थितीमध्ये विरोध हा खर्या अर्थाने होत नसून, जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्यासाठी विरोध केला जात आहे. विशेषत: जाती व धर्मावर आधारित पक्ष, पार्टी निर्माण झाल्याने देशाची एकात्मता खंडित होऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे कार्य राजरोसपणे घडत आहे.
परप्रांत व परदेशातून या देशात आणि राज्यात यापूर्वी एड्स, स्वाइन फ्लू आणि सध्या अनेकांचे प्राण व आर्थिक शोषण घडवणारा कोरोना महामारी विषाणूचा प्रादुर्भावाचा शिरकाव झाला आहे. यामुळे देशाची व राज्यांची अंतर्गत सुरक्षाही धोक्यात आल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
वास्तविक पाहता जशी बाह्य सुरक्षितता महत्त्वाची असते, त्याहीपेक्षा जास्त अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची ठरते. पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागत आहे. नागरिकांनी सावध होऊन लोकशाहीला अधिकाधिक बळकट व सक्षम बनवण्याची गरज निर्माण झाली आहे.
यासाठी नागरिकांना कायद्याचा चश्मा घालून परिवर्तन घडविण्याची वेळ आली आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याचे तसेच रयतेचे राज्य निर्माण करण्याची छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित घटनेचे राज्य
लोकांनी लोकांच्या सुरक्षेसाठी निर्माण केलेली लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याचे कार्य सैनिक समाज पार्टी करत असल्याचे अॅड. डमाळे व खिची यांनी म्हंटले आहे.