अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- मयत झालेल्या जागा मालकाच्या जागी तोतया जमीन मालक दाखवून खरेदीदार महेश सुमतीलाल संचेती, (रा.विनायकनगर) यांची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये १६ जानेवारी रोजी देण्यात आलेल्या
फिर्यादीवरून युवा सेनेचे ऋषभ मेहुल भंडारी (रा. स्टेशन रोड) यांना २५ जून रोजी सायंकाळी अटक करण्यात आली असून, त्यांना कोर्टात हजर केले असता न्या.खंडागळे यांनी १ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबात सविस्तर माहिती अशी, जून २०१९ मध्ये नगर तालुक्यातील वाळूंज येथील जागेचा व्यवहार महेश संचेती व ऋषभ भंडारी यांच्यात ठरून त्यापोटी संचेती यांनी ५० लाख रुपयांचे साठे खत केले होते.
मात्र काही दिवसातच सदर जमिनीचे मूळ मालक हे २०१८ सालीच मयत झाले. त्यांच्या जागी ऋषभ भंडारी यांनी तोतया जागा मालक उभे करून बनवत साठे खत केले असल्याचे निदर्शनास आले.
महेश संचेती यांनी ऋषभ भंडारी यांच्याकडेसाठे खताचे ५० लाख रुपये परत मागितले. मात्र भंडारी यांनी रुपये देण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतर संचेती यांनी भंडारी व त्यांचे साथीदार मोहित रापारीया तसेच जमीन मालक व त्याचे मुले म्हणून उभा राहिलेले तिघा तोतयांविरोधात कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली.
ऋषभ भंडारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने ते फरार झाले. नगर जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला तरी ते पोलीस स्टेशन मध्ये हजार न होता औरंगाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.
त्यावर रीतसर सुनावणी झाल्यानंतर त्या ठिकाणीही त्यांचा जमीन अर्ज फेटाळण्यात आला. कोतवाली पोलिसांनी युवा सेनेचे ऋषभ भंडारी यांना २५ रोजी सायंकाळी अटक केली असून आज जिल्हा न्यायालयात त्यांना हजर केले असता न्या. खंडागळे यांनी त्यांना १ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.