वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना गुलाम बनवले!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे, ओबीसींच्या राजकीय आरक्षण कायम रहावे व महागाई कमी करण्यासह

विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकार भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेऊन, सर्वसामान्य बहुजन समाजाला  भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे.

तर महाराष्ट्रातील राज्य सरकार अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गीयांच्या हित संवर्धन विरुद्ध काम करीत आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या पदोन्नती संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेवरुन स्पष्ट होत आहे.

केंद्र सरकारने सर्वच क्षेत्राचे सुरु केलेले खाजगीकरण व महागाईने सर्वसामान्यांना गुलाम बनविण्याचे कार्य सुरु असल्याची टीका करतअनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचार्‍यांना पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवावे,

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ओबीसींचे आरक्षण पुर्ववत करण्यात यावे, शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव द्यावा, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर व खाद्य तेलाच्या किंमती कमी करावे,

वाढती महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या, कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर बनली असताना वीज बील माफ करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले.

अहमदनगर लाईव्ह 24