रस्ते दुरुस्ती सुरु मात्र नगरकरांची नाराजी कायम… हे आहे कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  रस्त्यावर पडलेले खड्डे आणि या खड्ड्यांत साचलेले पाणी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नागरिकांची सातत्याने होणारी ओरड पाहता मनपाने रस्ते दुरुस्तीचे काम देखील हाती घेतले मात्र तरी देखील नगरकरांचा रोष कमी होताना दिसून येत नाही आहे.

नगर शहरातील खड्ड्यांविरोधात सोशल मीडियावर राग व्यक्त करण्याचे प्रमाण महापालिकेच्या आवाहनानंतरही कमी झालेले नाही. आता बुजविण्यात येणाऱ्या खड्ड्यांबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे.

शहरातील रस्त्यांवर ज्याठिकाणी खड्डे पडले आहे, त्या रस्त्यावरील पडलेले खड्डे स्वच्छ करून रस्त्याची खोदाई करून काम करणे आवश्यक असताना ठेकेदारांनी जेसीपी मार्फत रस्त्यावर खडी टाकून काम सुरू केलेले आहे. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर महापालिकेकडून सुरू असलेल्या या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

अशा पद्धतीने जर रस्त्याचा काम झाले तर एका महिन्याच्या आत रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडतील व संपूर्ण खडी पुन्हा निघून जाईल. दरम्यान नगर शहरातील रस्त्यांना अनेक वर्षांपासून ग्रहण लागले असून, अवघ्या शहरातीलच रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. एखाद्या गावातील रस्त्यांपेक्षाही शहरातील अनेक ठिकाणच्या या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

अवघे रस्तेच उखडल्याचे दिसत असताना कित्येक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊनच घराबाहेर पडावे लागते. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त, शहर अभियंता यांनी सदर रस्त्यांची पाहणी करून

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासन निर्णयचा पालन करून रस्त्याचे कामे करावी, जर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यास त्याच्या नुकसानीला जबाबदार आयुक्त व शहर अभियंता राहतील, असेही या सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.