अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- ठेकेदाराशी संगणमत करून पाथर्डी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या उपाभियंत्याने वरिष्ठांना हाताशी धरून मार्च २०२१ अखेर काम न करताच झालेल्या रस्त्याच्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला देऊन
ठेकेदारास बिल काढण्यासाठी हिरवा कंदिल दिला असून, रस्त्याच्या कामाची मुदत संपली तरी काम झालेच नाही.
मात्र, सबंधित अधिकाऱ्याने काम पूर्ण दाखवून बोगस बिल काढण्याचा प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबतची महिती अशी की, राजदीप मजूर सह. संस्था प्रभूपिंप्री, ता. पाथर्डी, या मजूर संस्थेच्या नावावर तालुक्यातील पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे नलवडे, या रस्त्याच्या सुमारे १० लाख रुपये अंदाजपत्रकीय रकमेचे ११०० मीटर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सबंधित संस्थेला डिसेंबर २०१९ मध्ये कार्यारंभ आदेश दिला. काम पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्च २०२१ होती.
प्रत्यक्षात या कालावधीत ठेकेदाराने कोणतेच काम केले नाही व न झालेल्या रस्त्याच्या कामावर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण जोशी यांनी भेट देऊन पाहणी केल्याची कागदोपत्री नोंद आहे.
गावात रस्ता नाही, बिल काढण्यासाठी मात्र पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता करून काम पूर्ण झाल्याचा दाखला देऊन ठेकेदाराला बोगस बिल मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला.
शुक्रवारी दुपारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, पं. स. सदस्य विष्णुपंत अकोलकर, उपसरपंच प्रकाश दौंडे, भरत नलवडे, अमोल नलवडे,
उत्तम नलवडे यांच्यासह ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. ठेकेदाराने दोन दिवसांपूर्वी रात्रीतून खडी व डांबर आणून काम सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले.