अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- अल्पसंख्यांक समाजाला प्रवाहात आनण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरु आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन, युवकांना दिशा देण्याबरोबर शहराच्या विकासात्मक दृष्टीकोनाने कार्य सुरु आहे.
खड्डेमय शहराची प्रतिमा बदलण्यासाठी विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून, नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध होणार आहे. राष्ट्रवादीत युवकांची शक्ती एकवटली असून, शहराचा विकासात्मक बदल घडणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहर सरचिटणीसपदी शाहरुख करीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार जगताप यांच्या हस्ते शाहरुख शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, ओबीसी सेलचे अमित खामकर, राजेश भालेराव, नीलेश इंगळे, सिध्दार्थ आढाव, शहानवाझ शेख, वसीम शेख, अब्दुल खोकर, सुफीयन शेख,
सरफराज कुरेशी, सलमान शेख, नदीम शेख, अन्वर शेख, सोहेल सय्यद, सिराज शेख, शाहरुख शेख, जैद सय्यद, इमरान शेख, सलमान शेख, अबुजर राजे, ईस्माइल शेख, अस्लम सय्यद आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार म्हणाले की, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाजातील प्रश्न सोडविण्यास कटिबध्द आहे.
विकासात्मक व्हिजन व युवकांना काम करण्याची संधी मिळत असल्याने शहरासह जिल्हा पातळीवर युवक राष्ट्रवादीशी जोडला जात आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील युवक विकास हा अजेंडा समोर ठेऊन कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नूतन पदाधिकारी शाहरुख शेख म्हणाले की, नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना मिळते. नेतृत्वाअभावी शहराचा विकास खुंटला होता.
संग्राम जगताप यांच्या रुपाने विकासाला चालना मिळाली. नगरकरांना एक चांगले विकासाचे व्हिजन असलेला नेता मिळाला असून, शहराची विकासात्मक दृष्टीने वाटचाल सुरु आहे. तर युवकांना काम करण्याची संधी देखील मिळत असल्याची भावना व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल शाहरुख शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.