अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील राळेगणथेरपाळ येथील अशोक सीताराम सालके या शेतकऱ्याच्या घराचा आतील दरवाज्याचा कोंडा कटावणीने तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागीने लंपास केले.
शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशोक सालके, त्यांची पत्नी, मुलगा तसेच सून हे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झोपले.
रात्री पाउस सुरू असल्यामुळे या कुटूंबास झोपण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त उशिर झाला होता. पहाटे एक वाजण्याच्या सुमारास संपूर्ण कुटूंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी कटावणीच्या मदतीने घराच्या दाराचा आतील कोंडा तोडला.
घरात प्रवेश करून कपाटातील काही पिशव्या तसेच इतर साहित्य त्यांनी हस्तगत केले. घरात प्रवेश करण्यापूर्वी घराबाहेर लावण्यात आलेला दिवा त्यांनी काढून घेतला. चोरी केल्यानंतर पाठलाग करू नये म्हणून दारातील दुचाकीचा प्लगही काढून घेण्यात आला होता.
चोरी करून पसार होताना चोरट्यांपैकी एकाची चप्पल घटनास्थळी आढळून आली आहे.दरम्यान, घरातील सामान बाहेर आणून अंगणामध्येच चोरट्यांनी उचकापाचक करीत त्यातील सहा तोळे सोन्याचे दागीने घेवून पसार झाले.
पहाटे एक नंतर सालके यांची नात उठल्यामुळे त्यांचा मुलगाही जागा झाला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे पाहून त्यांनी पाहणी केली असता, घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान राळेगणथेरपाळ, जवळे, कोहकडी परिसरात गेल्या दिवसांपूर्वी चोऱ्यांचे सत्र सुरू होते.
काही काही दिवसात ते थंडावल्याचे चित्र असतानाच शेतकरी कुटूंबाची घरफोडी झाल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.