अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे संपामुळे एसटी सेवा ठप्प झाली आहे आणि त्याचा फायदा खाजगी वाहतूकदार घेताना दिसत आहे.
संधीच सोन करत खाजगी वाहतूकदारांनी आपली मनमानी सुरू केली असून प्रवासी भाडे वाढविले आहे. यामुळे गोरगरिबांना प्रवास करणे शक्य होत नसून मोठया प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत आहे.
खाजगी वाहतूकदारांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एसटी महामंडळाच्या संपामुळे काही खाजगी वाहतूकदारानी व संस्था चालकांनी मोठया प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरु केली असून नगर-पुणे भाडे ८०० रुपये, नगर-मुंबई भाडे १६०० अशा चढ्या भावाने बेकायदेशीर मागणी करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक सुरु आहे.
या बाबत प्रशासन ही कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे काही खाजगी वाहतूकदार आपली मनमानी करीत आहेत. या परिस्थितीमध्ये सामान्य जनतेला प्रवास करणेही शक्य होत नाही. याबाबत प्रशासन व राज्यकर्ते यांनी या प्रकरणात लक्ष घालून एस टी महामंडळाचा संप मिटवाबा, अशी मागणी बोज्जा यांनी निवेदनाद्वारे केले आहे.