अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- ‘आपल्या पक्षातील एका ‘महान’ नेत्याने केलेल्या मूर्खपणाच्या विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल, अशी भीती आमच्यासारख्या नव्या पिढीला वाटते. त्यामुळे आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी योग्य पावले उचलली पाहिजेत,
ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदाररोहित पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे
आता रोहित पवार यांनी हिंदीतून ट्विट करीत पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचे या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. पवार यांनी म्हटले आहे की, ‘विरोधकांनाही मान देण्याची एक स्वतंत्र राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे.
आजवर सर्व पक्षातील नेत्यांनी ती टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण, शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करून राज्यातील भाजपच्या एका ‘महान’ नेत्याने अलीकडेच खालच्या स्तरापर्यंत मजल मारली आहे.
आपल्याकडेही देवी देवता म्हणून उपासना करण्याची संस्कृती आहे. पण, त्या ‘थोर’ नेत्याने आपल्या वक्तव्यात महिलांचा अनादरही केला आहे. आश्चर्य म्हणजे राज्यातील अन्य कोणत्याही भाजप नेत्याने त्यांना फटकारले नाही, किंवा त्यावर भाष्य केले नाही.
हे केवळ राज्याच्या संस्कृतीशी सुसंगत नाही तर माझ्यासारख्या नवीन पिढीला अशी भीती वाटते की अशा ‘महान’ नेत्याने केलेल्या मूर्खपणाच्या विधानांमुळे राज्यातील राजकीय संस्कृती खराब होईल.
मात्र, आम्ही हे होऊ देणार नाही. परंतु आपल्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, ही आमची अपेक्षा आणि विनंती आहे.’