रोहित पवार हे केवळ ‘WhatsApp’ आमदार ! काम कमी आणि प्रसिद्धी जास्त …

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  आमदार रोहित पवार हे WhatsApp आमदार आहेत. काम कमी आणि प्रसिद्धी जास्त करत आहे, तसेच पाण्यासाठी कायम सापत्नभावाची वागणूक राष्ट्रवादी काँग्रेस सरकारकडून जामखेडकरांना मिळाली आहे, असा आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला आहे.

तर १६ वर्षानंतर निधी प्राप्त झाल्यानंतर भूतवडा जोड तलावाचे काम मी पूर्ण केले आहे. भुतवडा तलाव शंभर टक्के भरला. यानिमित्त शुक्रवारी जलपुजन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत माजी मंत्री शिंदे बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य सोमनाथ पाचारणे, सहकार बँकचे संचालक अमोल राळेभात,

पंचायत समितीचे उपसभापती रवी सुरवसे, प्रवीण सानप, अमित चिंतामणी, पांडुरंग उबाळे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, मनोज कुलकर्णी, अरुण वराट, गोरख घनवट, बाजीराव गोपाळघरे, आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातर्गत ३ कोटी २२ लाख रुपये खर्चाच्या भुतवडा जोड तलावाच्या कामाचा शुभारंभ ६ मे १९९९ रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते झाला.

मात्र राज्यात सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने नंतर १५ वर्षात या तलावाच्या कामाला निधीच दिला नसल्याने हे काम अपुर्ण राहिले. मात्र २०१४ ला मंत्री झाल्यानंतर आपण या तलावाच्या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता घेत निधी मिळवत जोड तलावाचे काम पुर्ण केले.

यामाध्यमातून जुना भुतवडा तलावाची उंची वाढवण्याबरोबर जोड तलावामुळे साठवण क्षमता दीडपटने वाढण्यास मदत झाली.

भाजप युती सरकारच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ५ कोटी ६ लाख २७ हजार रूपये खर्चाची जामखेड शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ दिवंगत मुंडे यांच्या हस्ते झाला होता. मात्र ही पाणीपुरवठा योजनाही नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने रद्द केल्या, असेही माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office