रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन तर्फे टाकळीकाझी येथील तांड्यावरील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप.

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- आज बदलत्या काळात पारंपारिक कला जोपासणे व त्यावर उपजीविका करणे कठीण होत असून मुलांना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे.

भटक्या जमातीतील तांड्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठी तांड्यावरील महिलांनी मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत रोटरी अध्यक्षा रो. किरण कालरा यांनी व्यक्त केले.

यासाठी महिलांचे प्रबोधन करून मागर्दर्शन करून त्यांच्या विचार परिवर्तनासाठी विशेष उपक्रम सुरु करण्याचा मानस हि त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नगर तालुक्यातील टाकळीकाझी येथील तांड्यावर भटकंती करत उपजीविका करणाऱ्या बहुरूपी समाजाची कुटुंबे राहत असून कोरोना संकटामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत जगत आहेत.

येथे असणाऱ्या ४० ते ५० मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून युवा कार्यकर्ते श्री.युवराज गुंड अत्यंत तळमळीने कार्य करत आहे.

या मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने विविध उपक्रम राबविणाऱ्या या कार्यकर्त्याच्या कार्यास हातभार लावणे हि गरज रोटरीचे किशोर डोंगरे यांनी ओळखली.

यासाठी रोटरीच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. रोटरी साक्षरता अभियाना अंतर्गत परम कन्स्ट्रकशन पुणेचे रो.सुजित माने यांच्या आर्थिक सहकार्याने वह्या, पुस्तके, तक्ते,कलर बॉक्स,पाटी पेन्सिल ,फळा ,चटई आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या अध्यक्षा रो.किरण कालरा,साक्षरता मिशनचे रो.हेमंत कराळे,सौ.कराळे,रो.किशोर डोंगर,सौ.डोंगरे,आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योगशिक्षिका मंगल डोंगरे,

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सौ.अमृता जगताप,उद्योजक रो.सुजित माने,युवराज गुंड व तांड्यावरील बहुरूपी कलाकार उपस्थित होते.यावेळी तेथील मुलांनी सादर केलेल्या नकला व गाणी उपस्थितांची मने जिंकून गेली.

या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले उत्तम कलाकार बनू शकतात असा विश्वास यावेळी श्री.किशोर डोंगरे यांनी व्यक्त केला.श्री.युवराज गुंड यांनी तांड्यावरील भटक्या समाजाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले.

Ahmednagarlive24 Office