अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर- मनमाड रस्त्याचे कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे समवेत येत्या दोन दिवसात बैठक घेवून काम मार्गी लावणार असल्याचे खा. सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमसोबत चर्चा करताना सांगितले.
नगर- मनमाड रस्त्याची दुर्दशा व त्याबाबत जनतेत असलेला तीव्र असंतोष लक्षात घेता त्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असून या कामाला तातडीने गती मिळावी म्हणुन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांची संयुक्त बैठक दोन दिवसात आयोजित करण्यात येईल.
अशी ग्वाही खा.सदाशिव लोखंडे यांनी दिली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचे समवेत देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमचे सदस्य दत्तात्रय कडु व आप्पासाहेब ढुस यांनी खासदार लोखंडे साहेब यांची १२ सप्टेंबर रोजी उंबरगाव येथे भेट घेवून रस्त्याचे काम तातडीने सुरु करणेबाबत मागणी केली.
या प्रसंगी शिवसेनेचे नेते प्रमोद लभडे उपस्थित होते. पुढे बोलताना खा. लोखंडे म्हणाले की, सदर कामाची निविदा स्वीकृत झाली असुन ती २८.५ टक्के कमी दराची आहे.
संबंधित ठेकेदार काम सुरु करत नाही. याबाबत केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी साहेब तसेच केंद्रातील संबंधित अधिकारी यांचेशी सवीस्तर चर्चा केली असुन त्यांनीहि कामात प्राधान्याने लक्ष घालत असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती खासदार लोखंडे यांनी दिली.