पोलीस बंदोबस्तात सादिक बिराजदार यांचा दफनविधी शांततेत पार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- भिंगार पोलीस हद्दीमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्या सादिक बिराजदार या तरुणाचा दफनविधी रात्री 3 च्या सुमारास पार पडले.सादिक बिराजदार या तरुणाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने मयताचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार यांनी त्या हॉस्पिटल येथे धाव घेतल्याने काही काळ संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यावेळी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अत्यंत संयमाने आक्रमक झालेल्या जनसमुदायास शांत करून कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या व शांतता राखण्याचे आवाहन केले. 15 ऑगस्टच्या रात्री 7 ते 8.30 दरम्यान सादिक बिराजदार याला भिंगार पोलीस ठाण्यात घेऊन जात असता त्याच्यावर 5 जणांनी प्राणघात हल्ला केला आणि जीवे मारण्याच्या प्रयत्न केला अशी फिर्याद सादिक बिराजदारची पत्नीने भिंगार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

माञ दुसरीकडे भिंगार पोलीस सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलीस वाहनातून उडी मारल्याने त्याचा अपघात झाला अशी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मूनिया उर्फ अजीम रसूल सय्यद ,रशीद रसूल सय्यद ,कुद्दुस रशिद सय्यद, मोईन मुनिया उर्फ अजीम सय्यद , अर्शद मुनिया उर्फ अजीम सय्यद (सर्व रा. दर्गादयरा मुकुंदनगर) या पाच जणांवर गून्हा दाखल केला आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचा अहमदनगर शहरातील कामाचा अनुभव व जनसंपर्क असल्याने आणि संवेदनशील प्रकरण असल्याने बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली होती. त्यांनी चोख नियोजन व मयताच्या कुटुंबीय समवेत संपर्क ठेवून दफनविधी शांततेत पार पडला. ते स्वतः हजर राहून प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन होते.

तपास सीआयडी कडे वर्ग सादिक बिराजदार याच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला दोन पोलीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणत असताना तो जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे सादिकचा कस्टडी मृत्यू झाल्याने हा तपास सीआयडीकडे वर्ग होण्याची शक्यता आहे.

कारण पोलीस कस्टडीत असताना एखाद्या आरोपीचा मृत्यू झाला तर त्याचा तपास सीआयडीकडे वर्ग होतो. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाने सर्व सोपस्कार पूर्ण केले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तसा अहवाल सीआयडीकडे दिला आहे त्यावरून तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24