अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उद्या (शुक्रवारी) नगर दौऱ्यावर येणार आहेत.
नगर विकास विभागाशी संबंधित महापालिका आणि नगरपालिकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेणार आहेत.
ते येण्याआधीच त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहे. शहरात येणाऱ्या मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कमानी उभारून आणि पोस्टर लावून स्वागत केले जाते.
मात्र, नगरमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच भगवी कमान उभारण्यात आली आहे. त्यावर शिंदे यांचे मोठे फोटो लावण्यात आले आहेत.
तर बाजूला एक पोस्टर लावण्यात आले असून त्यावर माजी महापौर आणि त्यांच्या पतीचे फोटो आहेत. शहर शिवसेनेतर्फे हे स्वागत करण्यात येत असल्याचा त्यावर उल्लेख आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर अशी कमान उभारण्याची परवानगी शिवसेनेला कोणी दिली? परवानगी नसेल तर अशी कमान कशी उभारू देण्यात आली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
कारण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन वर्षांपासून उपोषणाचे मंडप आणि फलक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांनाही वेगळी जागा ठरवून देण्यात आली आहे.
अशा पद्धतीने प्रतिबंधित क्षेत्र ठरत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरच पक्षीय जाहिरात करण्यास अधिकाऱ्यांनी कशी परवानगी दिली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.