अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- बहुद्देशीय कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव शंकर काते यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव घोरपडे यांनी काते यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
साहेबराव काते यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य सुरु आहे. काते यांनी मागासवर्गीय समाजाच्या विकासात्मक कार्यात मागील 22 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांनी अनेक आंदोलने, चळवळ विविध सामाजिक विषयांवर समाजातील प्रश्न मांडून, सदर प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे.
तसेच मागासवर्गीय समाजातील गरजू कुटुंबातील व्यक्तींना जातीचे दाखले, वैद्यकिय मदत, रेशन कार्ड, महामंडळाचे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा करुन लाभार्थींना योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच मागासवर्गीयांचे कर्ज माफ होण्यासाठी ते शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहे.
या सामाजिक कार्याची दखल घेत काते यांना संघटनेचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव घोरपडे यांनी स्पष्ट केले. साहेबराव काते यांनी बहुद्देशीय कामगार सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील असंघटित व संघटित कामगारांसाठी कार्य करणार आहे.
एमआयडीसी व इतर वर्गातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असून, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल काते यांचे योसेफ काते, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, गणेश ढोबळे, सतीश बोरुडे, भगवान जगताप, सतीश रोकडे, नवनाथ भोसले आदिंनी अभिनंदन केले.