अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- शिर्डीत वाहतूक पोलीस कारवाईचे असलेले दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साईभक्तांची वाहने अडवून बरोबर असणार्यांंवर सुद्धा चुकीच्या कारवाईचा बडगा उगारून पावत्या फाडत आहेत.
शिर्डी वाहतूक शाखेकडून साईभक्तांना वेठीस धरून त्रास देण्याचा हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला आहे. एक वाहन थांबविण्यात आल्यानंतर त्याचे विरोधात कारवाई करतेवेळी चारपाच पोलीस गोळा होतात.
एक पावती फाडून कारवाई करण्यासाठी संबंधित चालकास तासंतास थांबवून धरतात. शिर्डी वाहतूक शाखेच्यावतीने शहरात दररोज पावत्या फाडुन सरकारी वसुलीचा हा प्रकार अनेकांच्या पथ्यावर पडत असतो.
यावरून वाहतूक पोलीस पैशासाठीच साईभक्तांना त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले होते. बाहेरुन येणार्या साईभक्ताला शिर्डीत प्रवेश करताच वाहतुक पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागते.
नंबर प्लेट बघून परजिल्हा व परराज्यातील पासिंगच्या गाड्या अडवून शिर्डी वाहतूक पोलीस मनमानी पध्दतीने साईभक्तांकडून अर्थकारण साध्य करत असल्याची चर्चा आहे.
एखाद्या भक्ताने पैसे देण्यास टाळाटाळ केली तर त्याच्यावर कायदेशिर कारवाईचा बडगा उगारून त्याला त्रास दिला जातो परिणामी शिर्डीत येणारा साईभक्त त्रस्त झाला आहे.
वाहनधारकांना धारेवर धरत एकीकडे पावत्या फाडण्याचा सपाटा लावला तर दुसरीकडे रस्त्यावर वाहतुक कोंडी होते. त्याकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते.