अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-साईबाबा संस्थानने आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस दिली; मात्र कोविड सेंटरवर काम करणाऱ्या स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा जणु विसर पडला आहे.
हे कर्मचारी कोविड प्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. संस्थान प्रशासनाने तातडीने या कर्मचाऱ्यांना लस दयावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
साईसंस्थानच्या कोविड सेंटरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. काही रूग्ण बाहेर प्रतिक्षा करत आहेत. मोठ्या शहरांतील खासगी रूग्णालयात जागा शिल्लक नाही.
बेड शिल्लक नसल्याने गोरगरीबच नाही तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे रुग्ण संस्थानच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत.
आर्थिक संकटाच्या कालावधीत संस्थानचे कोविड सेंटर सर्वांसाठी आधारवड बनले आहे. संस्थानने आपल्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना मोफत लस दिली;
मात्र या सेंटरवरील स्वच्छता व सुरक्षा कर्मचाऱ्यांना ही लस अद्याप मिळू शकली नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा थेट रूग्णाशी संपर्क येतो.
तसेच सेंटरला येणारा प्रत्येक रूग्ण व नातेवाईक सुरक्षा रक्षकाच्या संपर्कातूनच पुढे जातो. त्यामुळे या दोन्ही घटकांना ही लस देणे अत्यंत गरजेचे आहे.
तुटपुंजा पगार व परिस्थिती नसतानाही या कर्मचाऱ्यांची पैसे देऊन लस घेण्याची तयारी आहे. मात्र अद्याप लस मिळू शकली नाही.