अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना भिंगार कॅम्प पोलिसांनी जेरबंद केले आहे.राजु एकनाथ पिटेकर व सतिष एकनाथ पिटेकर (दोघे रा.मिरी माका, ता. नेवासा जि.नगर) अशी त्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कापुरवाडी येथे दि.७ जुलै रोजी गणेश मगर यांच्या राहत्या घरातून दोन अज्ञात व्यक्तींनी भरदिवसा घरफोडी करून घरातून २४ हजार रुपयांची रोख रक्कम व २८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले होते.
याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना, सपोनि शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली की, सदर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी हे नगर शहरात स्टेट बँक चौक येथे फिरत आहेत.
त्यानुसार सपोनी देशमुख यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव, गाव विचारले असता त्यांनी राजु पिटेकर व सतिष पिटेकर असे सांगितले. त्यांची अंगझडती घेता त्यांच्या ताब्यात रोख रक्कम १० हजार मिळून आले.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवून गुनह्यातील पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली.