संभाजीराजे पोहचले कोपर्डीतील निर्भयाच्या कुटुंबियांच्या भेटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे जाऊन निर्भयाच्या आई वडिलांची भेट घेतली.

निर्भयाच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर पुन्हा घरात येऊन आई-वडिलांची चर्चा केली. यावेळी त्यांनी निर्भया प्रकरणाचा खटला कुठवर आला आहे याची माहिती घेतली. संभाजीराजे सध्या मराठा आरक्षणासंबंधी राज्याच्या दौर्‍यावर आहेत.

आज ते कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे आले होते. कोपर्डी येथे जुलै 2016 मध्ये शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चांचे स्वरूप पुढे बदलत जाऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला होता.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी कोपर्डीला भेट दिली. पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले कि, कोपर्डी हत्याकांडाने नगर जिल्ह्यासह अख्खा देश हादरून निघाला होता. 2016 वर्षी घडलेल्या या प्रकरणातील आरोपींना जिल्हा न्यायालयाने 2017 साली फाशीची शिक्षा दिली.

मात्र, आता हे प्रकरण उच्च न्यायायात प्रलंबित आहे. त्यावर पुढची कारवाई का झाली नाही? माझी राज्य सरकारला विनंती आहे की हे प्रकरण विशेष खंडपीठापुढे चालविण्यासाठी अर्ज करावा.

हे प्रकरण विशेष खंडपीठापुढे जलद गतीने चालवून सहा महिन्यात निकाल देण्यात यावी. अशी मागणी सरकारने केली पाहिजे, असे स्पष्ट मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.

अहमदनगर लाईव्ह 24