संभाजीराजे म्हणाले ‘मराठा आरक्षणासाठी हा एकमेव पर्याय राहिला…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-‘मराठा आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने अध्यादेश काढणे आणि नंतर त्याचा कायदा करून घेणे हा एकमेव पर्याय राहिला आहे.

मात्र, तोपर्यंत राज्य सरकारने या प्रक्रियेला मदत करताना जे आपल्या हातात आहे, ते मराठा समाजाला द्यावे. या लढ्यातून मला स्वत:ला काहीही साध्य करायचे नाही.

राज्यातील ७० टक्के मराठा समाज गरीब आहे, त्यांच्यासाठी आपला हा लढा सुरू आहे,’ असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये बोलताना सांगितलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी काढलेला संवाद दौरा आज जामखेड इथं आला, तेव्हा ते बोलत होते. जामखेडकरांनी संभाजीराजेंचे जोरदार स्वागत केले. सभेसाठीही मोठी गर्दी केली होती. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी सभेला उपस्थित होते.

त्यांचा संभाजीराजे यांनी आवर्जून उल्लेख केला.’मराठा आरक्षण लढ्यात आतापर्यंत बऱ्याच घडामोडी होऊन गेल्या. शेवटचा पर्याय म्हणून केंद्र सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असे असले तरी सर्व मार्ग बंद झालेले नाहीत.

केंद्र सरकराने यासाठी अध्यादेश काढावा. त्यानंतर हा कायदा मंजूर करून घ्यावा, हा पर्याय खुला आहे. त्याला काही अवधी लागू शकतो. त्या काळात राज्य सरकारने त्यांच्या हातात जे देता येणे शक्य आहे, ते द्यावे.

त्यामुळे पूर्वी काढण्यात आलेल्या मोर्चांतील मागण्यांपैकी सहा प्रमुख मागण्या आम्ही पुढे ठेवल्या आहेत. त्यातीलच सारथी संस्थेसंबंधीची आहे. राज्यात जशी बार्टी, महाज्योती या संस्था विविध समाजासाठी आहेत, तशीच सारथीही सक्षम व्हावी, अशी आमची मागणी आहे.

आरक्षण मिळेपर्यंत या संस्थेमार्फत काही लाभ गरीब मराठा विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे,’ असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24