अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- तस्करीतून अल्पावधीतच मोठा माल मिळत असल्याने अनेकजन वाळूतस्करी करत आहेत. मात्र यातून अनेकवेळा वाद होत आहेत. नुकतीच राहुरी तालुक्यातील रामपूर येथे वाळू लिलावासंदर्भात आयोजित विशेष ग्रामसभेतच गावातील दोन विरोधी गटांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली.
राहुरी तालुक्यातील रामपूर येथे वाळू लिलावासंदर्भात सरपंच मीना मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, मंडलाधिकारी शिंदे, तलाठी मच्छिंद्र राहणे आणि ग्रामसेवक श्रीमती भरसकाळ यांच्या उपस्थितीत मारुती मंदिरासमोर ग्रामसभा आयोजित केली होती.
मंडळाधिकारी शिंदे यांनी सभेचे वाचन सुरू केले; परंतु राहुरी कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब साबळे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामसेवक श्रीमती भरसकाळ यांना बोलावून घेतले.
त्यांना सांगितले, की ग्रामसभा मारुती मंदिरापुढे न घेता ग्रामपंचायतपुढे घ्या; परंतु मंडळाधिकारी शिंदे यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर ठिकाण ग्रामपंचायतसमोर दिले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
त्यानंतर ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयापुढे घेण्यात आली. मंडळाधिकारी शिंदे यांनी ग्रामस्थांना विचारले की आपल्याला हा वाळू लिलाव मान्य आहे का? त्यावेळी अनेकांनी संमती दर्शवली. शिंदे यांनी हात वर करून मतदान घेण्याचे ठरविले. आधी वाळू लिलावाचा बाजूने हात वर करण्यात आले.
त्यामध्ये बहुतेक लोकांनी हात वर केले. लोकांची मोजणी सुरू असतानाच दोन गटांत वादावादी सुरू झाली. या गोंधळात शेतकरी नंदू खळदकर यांना मारहाण करण्यात आली.
सर्व प्रकरणाला दोन दिवसांपूर्वी अनधिकृत नळ जोडणीच्या वादाची किनार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुढील ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात घेण्यात येणार आहे.