संगीता पारनेरकर यांना संगीत विषयात पीएच. डी.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  पारनेर येथील डॉ. संगीता गुणेश पारनेरकर यांना संगीत विषयात पीएच. डी. प्राप्त झाली आहे. “उत्तर हिंदुस्तानी खयाल गायन के प्रस्तुतीकरण मे गुणात्मकता की दिशा मे रियाज की भूमिका” हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता.

अत्यंत अवघड मात्र तितकाच रंजक असा हा विषय त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण रितीने मांडला. संगीत गुणात्मक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या डॉ. संगीता पारनेरकर या पूर्णवाद परिवाराचे प्रमुख विष्णू महाराज पारनेरकर यांच्या स्नुषा, तर पूर्णवाद भूषण गुणेश पारनेरकर यांच्या पत्नी आहेत.

त्या ओम पूर्णवादी संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भारती विद्यापीठातून संगीत विषयात डाॅक्टरेट मिळवली आहे. देश विदेशात आपल्या संगीत साधनेचा विस्तार त्यांनी केला आहे.

संगीत क्षेत्रातील पहिले ई मासिक “खयाल” ची निर्मितीही त्यांनी केली आहे. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे आणि पंडिता शुभदा पराडकर यांचे त्यांना प्रोत्साहन मिळाले. डॉ. संगीता पारनेरकर यांना प्रबंध सादर करण्यासाठी डॉ. विकास कशाळकर यांनी मार्गदर्शन केले.

भारती विद्यापीठातून संगीत विषयात डाॅक्टरेट मिळवणाऱ्या भारती विद्यापीठाच्या त्या पहिल्या विद्यार्थीनी आहेत. या बद्दल स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्टस च्या सर्व विभाग प्रमुखांचे त्यांचे कौतुक केले आहे.

संगीतक्षेत्रात हा प्रबंध आदर्श आणि अभ्यासपूर्ण ठरेल याचा विश्वास वाटतो. मूळ विषयावर योग्य पद्धतीने मांडणी करुन हा प्रबंध संगीतक्षेत्रात काही वेगळे आणि दर्जेदार योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष तयार झाला आहे असे वाटते, असा आत्मविश्वास डॉ. संगीता पारनेरकर यांनी व्यक्त केला आहे. रियाज हा गायनाचा मूळ गाभा आहे.

आजच्या काळात या विषयाच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. श्रोते सर्वत्र आहेत मात्र नेमके काय ऐकावे आणि कसे ऐकावे याची शास्त्रशुद्ध रीत माहित नाही.

या प्रबंधात त्यांनी ऐतिहासिक दाखले, खयाल गायकीचा प्रवास त्यातील विशिष्ट घटना, नमुने आणि उदाहरण देत रियाजाचे महत्त्व आणि भूमिका विशद केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24