अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-जारो कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या साईबाबा संस्थानने दोन हॉस्पिटलच्या माध्यमातून लाखो भाविकांना माफक दरात उपचार उपलब्ध करून दिले आहेत.
असे असले तरी हॉस्पिटलला पूरक असलेल्या रुग्णवाहिका मात्र केवळ ११ असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या गोरगरीबांना उपचार तर स्वस्तात मिळतात, मात्र रुग्णवाहीकेसाठी हजारो रुपये मोजण्याची वेळ आली आहे.
सुरेश हावरे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासह अतिदुर्गम भागातील सेवाभावी संस्थांना रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र काही कारणाने तो वादग्रस्त ठरला. ते किती गरजेचे होते, ते आता समोर येत आहे.
साईबाबा संस्थानकडे सध्या दोन शववाहिणी, दोन कार्डियाक ॲम्ब्युलन्स, एक तवेरा, एक बोलेरो, पाच मारुती ॲम्बुलन्स अशा जवळपास ११ रुग्णवाहिका आहेत. यापैकी काही खरेदी केलेल्या तर काही साईभक्तांनी दान दिलेल्या आहेत.
साईबाबा संस्थानने कोविड सेंटर सुरू केले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिकांची टंचाई भासत आहे. साईबाबा संस्थानच्या रुग्णवाहिका माफक दरात सेवा देतात. काही खासगी रुग्णवाहिका नाडलेल्यांची आर्थिक अडवणूक करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
अशा वेळी साईबाबा संस्थानने रुग्णवाहिका एक तर खरेदी कराव्यात किंवा साईभक्तांना दान स्वरूपात रुग्णवाहिका देण्यासाठी आवाहन करणे गरजेचे आहे. असे केल्यास देशभरातून अनेक दानशूर साईभक्त दान देण्यासाठी पुढे येतील.
यामुळे रुग्णांचे होणारे आर्थिक शोषणदेखील थांबेल व रुग्णांच्या नातेवाईकांना माफक दरात ॲम्ब्युलन्स उपलब्ध होतील. यासाठी साईबाबा संस्थानच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच त्रिसदस्यीय समितीने धोरणात्मक निर्णय घ्यावा व तातडीने रुग्णवाहिका खरेदी कराव्यात.