अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरातील ज्येष्ठ सराफ व्यावसायिक आणि भवरीलाल सराफ ज्वेलर्सचे संस्थापक भवरीलाल जुगराज फुलफगर (वय ८९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
व्यवसायातील सचोटी, सोन्याच्या शुद्धतेबद्दलची पारदर्शकता आणि लोकसंग्रह यांमुळे शिरूरसह पारनेर, श्रीगोंदे तालुक्यात स्वतःचे आगळे स्थान मिळविलेल्या भवरीलाल यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिरूर सराफ व्यावसायिकांनी सर्व दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या मागे माजी उपनगराध्यक्ष नेमचंद फुलफगर, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक धरमचंद फुलफगर ही मुले तसेच नातू , सून, नातसून आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.
पूर्वी शिरूर शहरातील सुभाष चौक हा सराफ व्यावसायासाठी प्रसिद्ध होता. याच चौकात भवरीलाल यांची पेढी आहे. या पेढीला १७५ वर्षांची परंपरा आहे.
भवरीलाल यांच्या वडिलांनी या पेढीची स्थापना केली अन् भवरीलाल यांनी ती नावारूपाला आणली. झळकत्या प्रवासाची आणि कुशल कारागिरीची विश्वसनीय पेढी म्हणून जिल्ह्यात ही पेढी प्रसिद्ध आहे.