अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- वेगवेगळ्या 17 गुन्ह्यांत आरोपी असलेला एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वनकुटे परिसरात अटक केली.
मिलन उर्फ मिलिंद ईश्वर भोसले (वय 23 रा. बेलगाव ता. कर्जत, हल्ली रा. वनकुटे ता. पारनेर) असे आरोपीचे नाव असून आरोपीविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, भोसले याने त्याच्या साथीदारांसह 11 जून रोजी बाबाजी तुकाराम मोरे (रा. कामटवाडी ता. पारनेर) यांच्या गळ्याला चाकू लावून दरोडा टाकला होता.
सदरचा गुन्हा मिलिंद भोसले याने साथीदारांच्या मदतीने केला असून तो सध्या वनकुटे परिसरात राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली.
दरम्यान तात्काळ संबंधित परिसरात जाऊन पोलीस पथकाने भोसले याला वनकुटे ते ढवळपुरी रोडवर पाठलाग करून पकडले.
त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून सोन्याचे दागिने, दुचाकी, रोख रक्कम असा एक लाख एक हजार 850 रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात त्याचे भाऊ संदीप ईश्वर भोसले, मटक ईश्वर भोसले, पल्या ईश्वर भोसले, अटल्या ऊर्फ अतूल ईश्वर भोसले यांनी त्याला मदत केली असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.