अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगारांनी थकीत पगरप्रश्नी आंदोलन केले असता गुरूवार ९ सप्टेंबर रोजी एक पगार देण्याचे लेखी आश्वासन कारखाना व्यवस्थापनानेे दिल्याप्रमाणे शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पा आगमनाच्या दिवशी 1 पगार कामगार वर्गास मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
थकीत पगारासाठी तनपुरे कारखाना कामगारांनी १४ दिवस आंदोलन केले. यावेळी माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी मध्यस्थी करत माजीमंत्री राधाकृष्ण विखे व खा.डॉ.सुजय विखे यांच्याशी चर्चा करून आंदोलन मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. थकीत पगारांपैकी एक पगार ९ सप्टेंबर रोजी तर दुसरा पगार १७ सप्टेंबर रोजी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
त्यानुसार आज गणपती बाप्पा आगमनाच्या दिवशी कामगारांना एक पगार मिळाल्याने सर्वांनी आंनद व्यक्त केला. यावेळी कामगार बांधवांनी खा.डॉ.सुजय विखे, माजीमंत्री शिवाजी कर्डीले, चेअरमन नामदेव ढोकणे,
उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, सर्व संचालक मंडळ तसेच उपोषण मिटवण्यासाठी कामगार व व्यवस्थापन यांच्यात समनव्य घडवून आणण्यासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न करणारे भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनीत धसाळ, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे यांचे आभार मानले.
कामगार थकीत पगारप्रश्नी आंदोलन करून आमच्या मागणीसाठी आम्ही सर्व कामगारांनी आंदोलनाद्वारे लढा दिला. व्यवस्थापनाने लेखी अश्वासनाप्रमाणे आज १ पगार दिल्याने कारखाना व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करतो.
यापुढे व्यवस्थापनाने कामगारांना सहकार्य करावे निश्चितच कारखाना कामगार सकारात्मक राहून कारखान्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतील अशी प्रतिक्रिया कामगार नेते इंद्रभान पेरणे यांनी दिली. दरम्यान डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावर आज खा.सुजय विखे यांनी भेट दिली. यावेळी कामगार बांधवानी त्यांचे आभार मानले.