अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- महाराष्ट्र विधिमंडळाचे आजपासून (दि.०५ सप्टेंबर २०२१) दोन दिवसाचे अधिवेशन सुरु होणार आहे. परंतु हे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रुर थट्टा ठरणार आहे.
जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे स्पष्ट झाले आहे कारण दोन दिवसाच्या अधिवेशनात राज्यासमोरील कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांची चर्चा ह्या अधिवेशनात होऊच शकत नाही.
यामुळे विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेले अधिकार प्रश्न विचारणे, स्थगन प्रस्ताव करणे, लक्षवेधी सूचना मांडणे यांवरच गदा आली आहे. विधिमंडळामध्ये अधिवेशनाच्या कालावधीत महाराष्ट्रातील विविध प्रश्न मांडून महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात चर्चा करून जनतेला न्याय द्यायचे काम होत असते.
आरोग्य, रस्ते, गोरगरिबांचे प्रश्न यावर साधक बाधक चर्चा होऊन कायदे पास करायचे असतात किंवा राज्यात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करायची असते, सध्या महाराष्ट्रात मोठ्या स्वरुपात बलात्कार, दरोडे, दोन नंबर धंदे,
महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार अशा विविध समस्या निर्माण होत असताना त्यावर कडक कायदे करून जनतेला न्याय देण्याचे काम सभागृहाच्या माध्यमातून होणे अपेक्षित असताना कोणत्याही स्वरुपाची चर्चा न करता कोणतेही विषय चर्चेला न घेता
दोन दिवसांचे अधिवेशन ठेवून शासन महाराष्ट्रातील जनतेची मुस्कटदाबी करत आहे असा आरोप संदीप नागवडे यांनी केला. सरकार मधील मंत्र्यावर मधल्या काळात भ्रष्टाचार, महिले वरील अत्याचार यामुळे दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आणि काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील आहेत
तसेच कोविड काळात कोविड रुग्णांना सरकारच्या माध्यमातून योग्य ती मदत देखील केली गेली नाही तसेच लॉकडाऊन मुळे अडचणीत असणाऱ्या जनतेला कुठल्याही स्वरूपाची आर्थिक प᷃केज दिले नाहीत.
शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे व हलगर्जीपणामुळे महाराष्ट्र राज्यात देशात सगळ्यात जास्त कोविड रुग्ण व सर्वात जास्त कोविड मृत्यू झाले आहेत. या सर्व विषयावर विरोधी पक्ष प्रश्नाचा भडीमार करेन व हे आघाडी सरकार महाराष्ट्रातील जनतेसमोर उघडे पडेल या भीती पोटी अधिवेशन गुंडाळून फक्त दोन दिवसाचे ठेवण्यात आले,
तरी अश्या जुल्मी व अत्याचारी शासनाचा श्रीगोंदा भाजपाच्या वतीने धिक्कार करून मा. राष्ट्रपती व मा.राज्यपाल यांना ह्या शासनाच्या विरोधात कठोर कारवाई करावी व महाराष्ट्रातील लोकशाही वाचवावी अशा आशयाचे निवेदन महामहीम राष्ट्रपतींना व राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्या नावे प्रातिनिधिक स्वरुपात अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांच्याकडे देण्यात आले.
निवेदन देते वेळी श्रीगोंदा तालुका भाजपा अध्यक्ष संदीप नागवडे, बापुतात्या गोरे, अशोक खेंडके, भगवंत आप्पा वाळके, राजेंद्र उकांडे, जयश्री कोथिंबीरे, सुधीर खेडकर, संग्राम घोडके, अंबादास औटी, नानासाहेब लांडे, महादेव दरेकर, रोहित गायकवाड, प्रशांत पवार, ऋषिकेश गोरे, प्रशांत गिरमकर यांसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.