अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र आता शाळेतील विद्यार्थी देखील कोरोनाच्या जाळात सापडू लागले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच श्रीरामपूर तालक्यातील मालुंजा येथील एका शाळेतील विद्यार्थिनी करोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजीवनी दिवे यांनी दिली.
तसेच ग्रामस्थांनी आठवडे बाजार बंद करण्यात निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचे आजोबा नगर येथील एका रुग्णालयात करोना पॉझिटीव्ह म्हणून उपचार घेत आहेत.
त्यामुळे तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आल्याने तिची तपासणी करण्यात आली असता तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. शाळेने तातडीने बैठक घेऊन शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तिची तपासणी करण्यात आली त्यावेळी शाळा बंद होती. शाळेत नेहमी सॅनिटायर, थर्मलचा वापर करुन सोशल डिस्टन्सचा वापर करण्यात येत असतो.
त्यामुळे अन्य कोणाला करोनाची भिती नाही. तरीही पालकांचे संमतीपत्र घेऊन विदयार्थ्यांची करोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही दिवे यांनी दिली.
ग्रामस्थांनी याबाबत बैठक घेऊन आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून गावात योग्य ती खबरदारी घेत ग्रामस्थांनी करोनाबाबतचे सर्व नियम पाळावेेत, असे आवाहन करण्यात आले आहे.