अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारतर्फे पोषण आहार पुरविला जातो. हा पोषण आहार खिचडीच्या रूपाने दिला जातो.
मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने खिचडीऐवजी कोरडा शिधा पालकांपर्यंत पोहोचविला जात होता. परंतु तांदूळ व इतर धान्य पुरवठा करण्याचा ठेका ज्या पुरवठादाराला दिला होता त्याचा करार संपलेला आहे.
नवीन कराराच्या निविदाही काढण्यात आल्या होत्या. मात्र, कोट्यवधी रुपयांचा हा धान्य पुरवठ्याचा ठेका जिल्ह्यातील दोन नेत्यांच्या वादात अडकला आहे.
शालेय पोषण आहाराचे टेंडर नोव्हेंबर २०२० पासून रखडले आहे. मागील टेंडर जिल्ह्यातील एका दिग्गज भाजप नेत्याच्या कार्यकर्त्याला मिळाले होते.
मात्र, आता जिल्ह्यातील एका दिग्गज काँग्रेस नेत्याने हे टेंडर आपल्या कार्यकर्त्याला मिळावे यासाठी ताकद पणाला लावली. आपल्याच कार्यकर्त्याला हे टेंडर मिळावे यासाठी हे दोन्ही नेते जिद्दीला पेटले आहेत.
त्यामुळे डिसेंबरपासून शालेय पोषण आहाराचे वाटप रखडलेले आहे. परिणामी, जिल्ह्यातील चार लाख ६३ हजार ९६१ मुलांच्या तोंडचा घास हिरावला आहे.