अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक ती करोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे.
शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत. “ग्रामीण भागात ५वी ते १२वी तर शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा-महाविद्यालये सुरू झाली होती. त्यानंतर ग्रामीण भागात १ली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू केली होती.
त्याची फाईल मुख्यमंत्र्यांना मंजुरीसाठी पाठवली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
पाहुयात
शाळा सुरु करण्याबाबत सरकारची नियमावली
१) शक्य असल्यास प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनीक सुरु करावं
२) विद्यार्थ्यांचं तापमान नियमीतपणे तपासावं
३) शक्य असल्यास त्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी
४) सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात
५) हेल्थ क्लिनीकसाठी स्थानिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकांची मदत घ्यावी
६) यासाठी लागणारा निधी CSR फंडातून खर्च करावा
७) मुलांना शाळेत चालत येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं
८) ज्या शाळांमध्ये खासगी वाहनांनी विद्यार्थी येतात त्या वाहनात एका सीटवर एक विद्यार्थी प्रवास करेल याची काळजी घ्यावी
९) विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना चालक आणि वाहकांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावं शिक्षकांसाठीही महत्वाच्या सूचना
१०) जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबणाने किंवा सॅनिटायजरे हात धुण्याची विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी.
११) वह्यांची अदलाबदल होणार नाही यासाठी गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगावं.
१२) वेळ असल्यास शक्यतो गृहपाठ वर्गातच करुन घ्यावा.
१३) सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येऊ नयेत.
१४) कोरोनाची परिस्थिती सर्वसामान्य झाली की खेळ सुरु करायला हरकत नाही तरीही असे खेळ खेळत असताना आवश्यक ती काळजी घ्यावी. खेळाचं साहित्य सॅनिटाईज करावं.
१५) खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेषकरुन दमलेल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं.