अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- देवळालीत शाळा अन् महाविद्यालये रस्त्यांवर रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. विद्यार्थिनींची छेड काढणे, त्यांचा पाठलाग करणे यामुळे शालेय विद्यार्थिनी त्रस्त आहे.
याबाबत पोलिसांत तक्रारी करूनही स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने टारगटांचे मनोधैर्य वाढले आहे. शिक्षक आणि पालकांनाही या टारगटांनी धमकाविल्याच्या घटना घडू लागल्याने पालक संतप्त झाले आहेत.
या टारगटांचा बंदोबस्त करा, अन्यथा आम्ही दंडुके हातात घेऊ, असा इशारा पालकांनी दिला आहे. देवळाली येथील एका कॉलजेच्या प्रवेशद्वारासमोर टारगटांचा व सडक सख्याहरींचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
करोनानंतर शाळा अन् महाविद्यालय नियमितपणे सुरू झाले आहे. कॉलेजसमोर टारगट दुचाकीवर बसून भरधाव वेगात कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवित येथून गर्दीतून चकरा मारतात.
यानंतर दुपारच्या सत्रात लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी अनेक पालक येतात. त्यांना देखील या टारगटांचा त्रास सहन करावा लागत आहे. अंगावर गाडी घालणे, मुलींना व महिलांना बघून कट मारणे, आचकट विचकट टोमणे मारणे, कानाखाली मोबाईल घेऊन भरधाव वेगात गर्दीतून दुचाकी घेऊन जाणे, हे नित्याचेच प्रकार झाले आहेत.
याबाबत शाळेतील शिक्षकांनी या टारगटांना समज देण्याचा प्रयत्न केला असता तुमची जबाबदारी गेटच्या आत, बाहेर तुमचा काय संबंध? इथं राहायचं, का जायचं? असा दम दिला जातो. याबाबत पालक वर्गामध्ये तिव्र संताप आहे.
याठिकाणी गावातील पोलिसांनी सकाळी व दुपारी शाळा भरण्याच्या वेळेस साध्या कपड्यात येऊन पाहणी करून टारगटांना धडा शिकवावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. अन्यथा मुलांचे शिक्षण घेणे अवघड असल्याचे पालकांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम