अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकजण घरगुती विलगीकरणात राहतात. अशा घरगुत्ती विलगीकरणात राहणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे इतर नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ शकते.
ते टाळण्यासाठी पिंपरी महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली असून आता जे कोरोनाबाधित नागरिक घरगुती विलगीकरणात राहतात त्यांच्या हातावर शिक्का तर मारण्यात येणार आहेच पण त्याचसोबत त्यांच्या घरावर अथवा दरवाजावर १४ दिवसांसाठी फलक लावावेत.
जेणेकरून इतरांना येथे रूग्ण असल्याचे माहित होईल असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. सध्या घरगुती विलगीकरणातील रुग्णांची संख्या शहरात पाच हजारांहून अधिक आहे. घरी विलगीकरणातील रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येत नाहीत.
मात्र जर या रुग्णांनी जर पुरेशी दक्षता घेतली नाही तर ते कोरोनाचे ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात. ही बाब लक्षात घेऊन आयुक्तांनी हे आदेश काढण्यात आले आहेत. घरगुती विलगीकरणातील करोनाबाधित व्यक्तींची माहिती जवळच्या आरोग्य केंद्रास देणे आवश्यक राहील.
तसेच, त्यांच्यावर कोणत्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत, याबाबतची माहिती देखील द्यावी लागेल. असे सांगण्यात आले आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरातील इतर सदस्यांच्या हालचालीवर देखील मर्यादा असणार आहेत. त्याचसोबत त्यांना मास्क वापरणे बंधनकारक असेल.
या नियमांचे पालन न केल्यास कोविड बाधित व्यक्तींना महापालिकेच्या कोवीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येईल. कोविडबाबतच्या आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.