अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर असून देशाच्या ६० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. यामुळे केंद्र सरकारनेदेखील तातडीने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि काही मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. बुधवारी एका दिवसात कोरोनाचे २३ हजार १७९ रुग्ण सापडले होते. तर ८४ मृत्यू झाले होते. आजही यामध्ये तेवढीच वाढ होण्याची शक्यता आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. सध्या राज्यात एक लाख ५२ हजार ७६० रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्य़ेला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यात 56 टक्के कोरोना लस शिल्लक असल्याचे सांगत लस का वापरली नाही, आताही गोंधळ सुरु आहे असा आरोप केला होता.
कोरोना रोखण्यासाठी मंत्रालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा घातलीय.पण कामासाठी भेट देणा-यांची गर्दी आहेच. रोज तीन ते चार हजार नगरीक मंत्रालयात येतात. त्यात राजकीय कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरच्या सर्वांच्या सरसकट लसीकरणाची मागणी पंतप्रधानांकडे केली.
राज्यातला लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.. पंतप्रधानांनी व्हिसीद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली.