अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात कठोर निर्बंध देखील लावले आहे.
मात्र तरी काही बेजबाबदार नागरिक या नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या घटना घडत आहे. यातच राहुरी शहर हद्दीतील नगर-मनमाड रोडवर असलेल्या गाडगे महाराज काॅम्प्लेक्ससमोरील मोकळ्या जागेत काही दारूडे दारू पीत बसले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे पोलीस पथकासह शहरात गस्त घालत होते. काॅम्प्लेक्ससमोर निवांत दारू पीत बसलेले तरुण पोलिसांना पाहून पसार झाले. मात्र त्या ठिकाणाहून तीन दुचाकींसह दोन दारूच्या बाटल्या असा एकूण ४० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
याबाबत हवालदार आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.