ज्येष्ठ नेते शरद पवारांना मिळणार ‘ही’ मानाची पदवी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी देण्यासाठीचा विषय सिनेट सभेत मंजूर करण्यात आला आहे.

या विषयाला सिनेट सभेत मंजुरी मिळाली असली तरी त्यापुढील विविध टप्प्यात हा प्रस्ताव दाखल होऊन अखेरीस राजभवनातून याबाबतची मंजुरी मिळाल्यानंतर हा पदवीप्रदान सोहळा होणार आहे. सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात येणारी ही दुसरी डी.लिट पदवी असणार आहे.

सोलापूर विद्यापीठातर्फे पहिली डि. लिट पदवी ही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आली आहे. तर 2014 साली ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एस्सी) या मानद पदवीने सन्मानित केले होते.

त्यानंतर आता सोलापूर विद्यापीठाची ही दुसरी डि. लिट पदवी ज्येष्ठ नेते आणि पद्मविभूषण शरद पवार यांना देण्यासाठीची प्राथमिक मंजुरी सिनेट सभेत देण्यात आली आहे.

राज्यपाल भवनाकडून ठरणार तारीख :- माजी केंद्रीय कृषीमंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कृषीसह देशाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव डी.लिट. पदवी देऊन करावा, असा ठराव सिनेट सदस्य प्रा. गायकवाड यांनी आज सिनेट अधिसभेत मांडला.

त्याला बहुमताने मंजुरी मिळाल्यानंतर आता तो प्रस्ताव विद्या परिषदेच्या माध्यमातून राज्यपाल भवनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर पवार यांना पदवी देण्यासंदर्भात तारीख निश्‍चित होणार आहे. विशेष म्हणजे रिपाइंचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ सरवदे यांनी त्या प्रस्तावाला सिनेट सदस्य म्हणून अनुमोदन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24