ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारच्या विरोधात करणार आंदोलन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे संकेत आहेत. त्यांनी राळेगणसिद्धी येथे राज्यातील २७ जिल्ह्यांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे विश्वस्त व जिल्हा प्रतिनिधी यांची राळेगणसिद्धी येथे महत्वपूर्ण बैठक झाली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे निवडक कार्यकर्त्यांना बोलावत व सर्व नियमांचे पालन करून बैठक पार पडल्याची माहिती माजी सरपंच लाभेष औटी यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना हजारे म्हणाले की, सरकार कोणतेही असो जनहिताच्या प्रश्नांकडे सरकार डोळेझाक करत असेल तर त्याला जाणीव करून देण्यासाठी पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल.

त्यासाठी सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोन असलेल्या समविचारी कार्यकर्त्यांचे संघटन उभे करावे लागेल. महाराष्ट्रात भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्षम लोकायुक्त होणे आवश्यक आहे.

त्यासाठी एक संयुक्त मसुदा समिती कार्यरत आहे. मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी केवळ एक दोन बैठका बाकी आहेत. हा कायदा होण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलनाच्या तयारीत राहण्याचे आवाहन यावेळी हजारे यांनी कार्यकर्त्यांना केले.

अहमदनगर लाईव्ह 24