अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे आज सायंकाळी साडे पाच वाजता निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.
राज्यातील सर्वात मोठ्या तमाशा मंडळाच्या मालकीन असलेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत, राज्याचा पहिलाच विठाबाई नारायणगावकर पुरस्कार प्राप्त, तमाशा सम्राज्ञी श्रीमती कांताबाई सातारकर या कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या.
कांताबाई सातारकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर संगमनेर येथे गेल्या काही दिवसांपासून उपचारही सुरू होते. मात्र, वयोमानामुळे त्यांची प्रकृती दिवसे न् दिवस खालावत होती. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर आजच अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. त्यांचे चिरंजीव रघुवीर खेडकर हे तमाशा फडमालक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत. रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर हा तमाशा राज्यात प्रसिद्ध आहे.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ असल्याने गावोगावच्या जत्रा होत नाहीत. परिणामी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत सरकारने मदत केली पाहिजे, याबाबत मायलेक भूमिका मांडत.
सातारकर यांनी वयाच्या नवव्या वर्षी तमाशात पदार्पण केलं.तुकाराम खेडकर यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्यांनी अनेक वगनाट्य केली. नृत्य ही त्यांची खासियत होती.
वगनाट्यातील राजकीय, राजकीय, धार्मिक भूमिका गाजल्या. सन २००५मध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाचा राज्य सरकारचा पहिला जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं होतं.