अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यात काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या
स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंनी दिल्याचा दावा भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आला आहे.
भाजपाच्या या दाव्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एनआयएने अटक केलेल्या वाझे यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
वाझेंना अटक झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचवण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली.
हे प्रकरण गंभीर असून ‘एनआयए’ला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून आणखी बरीच माहिती समोर येईलच, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ ही स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.