अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व सध्या विशेष पॅरोलवर सुटका झालेला नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.
शेळके याची भरदिवसा त्याच्या घराजवळ गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. शेळके त्याच्या शेतात सुरू असलेल्या शेततळ्याच्या कामावरील मजुरांना सूचना देऊन शेतातील घराकडे येत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
हल्ला झाला त्यावेळी शेळके एकटाच होता, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी दिली. धारदार शस्त्राने शेळकेच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्याला शिरुर (पुणे) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अकरा वर्षांपूर्वी १३ नोव्हेंबर २०१० रोजी नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांची डोक्यात गोळी घालून भाडोत्री शार्प शूटरकडून हत्या करण्यात आली होती.
कांडेकर व माजी सरपंच राजाराम शेळके यांच्यात राजकीय वैमनस्य होते. हत्या झाल्यानंतर कांडेकर यांचे भाचे व विद्यमान उपसरपंच राजेश शेळके यांनी राजाराम शेळके यांच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी राजाराम शेळके व त्याच्या मुलास ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
चौकशीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. राजाराम शेळके याने मरेकऱ्यांना सुपारी देऊन कांडेकर यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुख्य सूत्रधार राजाराम शेळके, त्याचा मुलगा राहूल याच्यासह पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.