अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर आरोप करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आघाडी सरकारवर टीका केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ या देवरे यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी थेट पारनेरला येऊन देवरे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता. देवरे यांची बदली झाल्यानंतर वाघ चांगल्याच संतापल्या आहेत.
त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘देवरे यांची जळगावला बदली केल्याच्या निर्णयाचा जाहीर निधेष.
हे महाविकास आघाडीचे सरकार लोकधार्जीणे नाही तर यांचे आमदार मंत्री बगलबच्चे धार्जिणे आहे. ही बदली एकट्या देवरे यांची नाही. राज्यात सुमारे पाचशे महिला तहसिलदार अशाच परिस्थितीत काम करीत आहेत.
त्यांचे मनोबल खच्ची करणारा हा निर्णय आहे. महिला सक्षमीकरण, महिलांना पुढाकार देणे हे फक्त कागदावर राहिले आहे. ज्या दिवशी मी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे यासंदर्भातील पत्र घेऊन गेले होते,
त्या दिवशी पारनेरचे आमदार लंके याच विषयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन बसले होते. लंके यांनी देवरे यांना अनेक धमक्या दिल्या आहेत.
आरोग्य विभागातील महिला अधिकाऱ्यांनाही त्रास दिला आहे. या करोना योदध्यांवर हात उलचणाऱ्या लंकेविरूद्ध अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
अजित पवारांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती. महिला अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत,’ असेही वाघ यांनी म्हटले आहे.