अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे लस उपलब्ध झाल्याची वार्ता कळताच लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली; मात्र लसीचा मर्यादित साठा आणि व स्थानिक प्रशासनाच्या यादी प्रसिद्धीच्या गोंधळामुळे लसीकरण केंद्रावर सावळा गोंधळ पहावयास मिळाला.
कोल्हार खुर्दमध्ये लसीकरणाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या नागरिकांनी लस आल्याची माहिती मिळताच लसीकरण केंद्रावर एकच गर्दी केली.
कोल्हार खुर्द ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय यांनी एक यादी प्रसिद्ध करून या यादीप्रमाणे लसीकरण केले जाईल, असे सांगितले; मात्र या यादीमध्ये चक्क मयत लोकांचीसुद्धा नावे टाकण्यात आली.
ही यादी प्रसिद्ध करताना संबंधित अधिकारी भानावर नव्हते का? असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. यामुळे तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत यांचा सुस्त कारभार मात्र चव्हाट्यावर आला.
या गोंधळामुळे काही गावपुढाऱ्यांनी आपली ओळख आणि वजन वापरून विनानंबरने स्वत:चे लसीकरण करून घेतले. सामान्य जनतेला मात्र वाऱ्यावर सोडल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली.
ग्रामस्थांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. मयतांसह गावातील लोकांची यादी प्रसिद्ध झाली, यावर तलाठी कार्यालय व कोल्हार खुर्द ग्रामपंचायत हात झटकून मोकळे झाले.
व्हॉट्सॲपवर ही यादी प्रसिद्ध करून त्याखाली तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील व सरपंच यांच्या विनंतीची पोस्ट असल्याने गोंधळ झाला.
जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न या महमारीने निर्माण केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लस व्यवस्थित कशी मिळेल,
यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गाव पुढाऱ्यांनी यामध्ये लुडबुड करू नये, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक रंगनाथ गाढे यांनी केली.