मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेत फूट पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली आहे, असा दावा दीपक केसरकरांनी केला आहे.
मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे. शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावे याची अट ठेवलेली नाही असे सांगितले होते. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती. भुजबळांना तर ते स्वत: बाहेर घेऊन गेले होते. राज ठाकरेंच्या पाठीशीही त्यांचे आशीर्वाद होते. राज ठाकरे त्यांना मानतात, असे केसरकरांनी सांगितले आहे.