Maharashtra News:‘ज्यावेळी राज्याचे नेतृत्व हे मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीत अयशस्वी होते तेव्हा श्रीलंकेत जे घडले आहे तशी परिस्थिती दिसते. तीच परिस्थिती आता आपल्या शेजारच्या इतर देशांत दिसू लागली आहे.
आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याची नोंद देशाच्या राज्यकर्त्यांनी विशेषत: नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्व घटकांनी घेण्याची अत्यंत गरज आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
प्रसार माध्यमांशी बोलताना पवार यांनी शेजारील देशातील परिस्थिती आणि आपल्या देशातील राजकारण यांचा संबंध जोडत हे मत व्यक्त केले आहे.
पवार म्हणाले, लोकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची जी नेतृत्वाची जबाबदारी होती ती हवी त्या प्रमाणात पाळली गेली नाही. त्यामुळे श्रीलंकेत असंतोष वाढायला लागला.
हा असंतोष एका दिवसाचा किंवा एका महिन्याचा नाही तर गेले काही महिने सतत असंतोष वाढत होता. परिणामी अखेर उद्रेक झाला आणि तिथे राज्यकर्त्यांना सत्ता सोडावी लागली.
आज भारताच्या दृष्टीने आजूबाजूच्या देशांमध्ये अंतर्गत परिस्थिती नीट राहणे गरजेचे आहे. ज्यावेळी राज्याचे नेतृत्व हे मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीत अयशस्वी होते तेव्हा श्रीलंकेत जे घडले आहे तशी परिस्थिती दिसते.
तेच आज आपल्याला बांग्लादेशमध्ये दिसायला लागलेय. कदाचित पाकिस्तानमध्ये सुद्धा हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याची नोंद देशाच्या राज्यकर्त्यांनी विशेषत: नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्व घटकांनी घेण्याची अत्यंत गरज आहे.
जिथे सत्ता केंद्रीत झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतामध्ये सत्ता राष्ट्रीय पातळीवर केंद्रीत होईल का अशी शंका लोकांच्या मनात येत आहे.
आज तसे चित्र दिसत नाही, परंतु आपण सावध राहण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही.
ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. नितीश कुमार यांची तक्रार आहे की, भाजप सोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे.
त्याचे उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल, महाराष्ट्रातील शिवसेना आणि आता बिहारमधील नितीशकुमार यांचा पक्ष यांची देता येतील, असेही पवार म्हणाले.